मुंबई – केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून माझी व माझ्या कुटुंबाची हेरगिरी करण्यात येत आहे याबाबतचे पुरावे माझ्याकडे असून याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.
दुबईमध्ये कार्यक्रमाला गेलो असताना दोन लोकं माझ्या घराची, शाळांची व नातवंडांची माहिती घेत असताना नागरीकांनी हटकले होते त्यावेळी ते पळून गेले. त्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींची माहिती प्राप्त झाली आहे. ‘कू’ हॅंडलवर त्याने माझ्याविषयी याबाबतची माहिती शेअर केल्याचे दिसत आहे. माझी व माझ्या कुटुंबियांची माहिती कुणाला हवी असेल तर मी द्यायला तयार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
माझ्या विरोधात काही केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी व्हॉटस्ॲपवर स्वतः मसुदा तयार करुन ईमेलव्दारे खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत. याबाबतचे केंद्रीय अधिकाऱ्याच्या व्हॉटस्ॲप चॅटचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करणार असेल तर ते सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे अधिकारी याप्रकारे कारवाई करणार असतील तर ते आम्ही बघू पण असे डाव खेळून भीती निर्माण करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करत असेल तर या डावाला घाबरणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
एका मंत्र्यांची हेरगिरी करुन खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब आहे त्यामुळे याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे रितसर करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.