गिरीश कुबेरांच्या पुस्तकाचं साधं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून कुबेर यांच्यावर शाईफेक ?

नाशिक – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर (Girish Kuber) आज साहित्य संमेलन परिसरात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी शाई फेकली. संमेलनाच्या मुख्य मंचाच्या मागे ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे.

आज दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला.दरम्यान, शाई फेक करण्यात आल्यानंतर नितीन रोटे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचे कारण सांगितले.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह  लिखाण केल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत आहात? असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला परंतु, त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. फोन सुरूच असताना ते आजूबाजूला पुस्तकाचे नाव विचारू लागले. पण तेथे कोणालाच पुस्तकाचे नाव सांगता आले नाही.

पुढे त्यांनी कोणाला तरी फोन करून पुस्तकाचे नाव विचारले. त्यावेळी समोरून पुस्तकाचे नाव सांगण्यात आले परंतु, समोरून सांगितलेले नावही पाटील यांना सांगता आले नाही. तरीही ते शाई फेकण्यात आल्याची गोष्ट अभिमानाने सांगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुस्तकाचं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.