मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं; शिवरायांना अपेक्षित असणारा कारभार त्यात राहणारे मंत्री करतील ?

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जाणारे हे बंगले आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवलं आहे.

राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावं मिळणार आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या A6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ असं नाव देण्यात आलंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या B2 बंगल्याला ‘रत्नसिंधु’ असं नाव देण्यात आलंय. दरम्यान, किल्ल्यांची नावे दिल्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वगत केले आहे सोबतच नावं बदलल्यानंतर छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा कारभार देखील त्यात राहणारे मंत्री करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.