चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला – नाना पटोले

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व वेदनादायी असून त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.

आपल्या शोकसंदेशात नाना पटोले म्हणाले की, कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी जाधव यांचे विशेष नाते होते. आपल्या कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. जाधव हे यशस्वी उद्योजक व उत्तम फुटबॉल खेळाडू होते. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशिल होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विजयी होत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. दोन वर्षाच्या आमदारकीच्या काळातच त्यांनी कोल्हापूर शहर व उद्योगाच्या विकासाच्या ध्यास घेतला होता. लोकांच्या समस्या सोडण्यासाठी ते तळमळीने काम करत. शांत, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे देखील पहा