Nana Patole | मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता नरेंद्र मोदींच्या थोपेबाजीला बळी पडणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. मुस्लीमांना संपत्ती वाटणार हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेच नाही हे स्पष्ट असतानाही नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा काँग्रेस मुस्लीमांना संपत्ती वाटणार असा अपप्रचार करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. आरक्षणाला आरएसएस व भाजपाचाच विरोध आहे उघड असताना काँग्रेस एस.एस., एस.टी. व ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लीमांना देणार या आरोपात काहीही तथ्य नाही.
पंतप्रधान पदावरील व्यक्तींनी काहीतरी ताळतंत्र ठेवून बोलावे अशी अपेक्षा असते पण आरएसएसच्या खोटे पसरवण्याच्या शिकवणीतून नरेंद्र मोदी यापेक्षा वेगळे काही बोलू शकतील असे वाटत नाही. काँग्रेसवर मुस्लीम तुष्टीकरणाचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या भाजपाने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसमशी युती केली आहे. याच तेलुगु देसमने हज यात्रेसाठी १ लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे हे मोदींना कसे चालते? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप