Nana Patole: शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेत सुधारणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नसताना त्यात बदल केले गेले. कृषी आयुक्तांनी त्याला विरोध केला असता त्या कृषी आयुक्ताचीच बदली करण्यात आली. या डीबीटी योजनेतून मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप करत सरकारने या घोटाळ्यावर १५ दिवसात उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कृषी डीबीटी योजनेत जे साहित्य खरेदी केले ते बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन खरेदी करण्यात आले. हे कंत्राटही गुजरातच्याच एका कंपनीला देण्यात आले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतानाही राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये झालेली वाढ गंभीर आहे. सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला पण वाढत्या आत्महत्या होत असताना, कृषी क्षेत्रात पिछेहाट होत असताना पुरस्कार कशाच्या आधारावर मिळाला. राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली, पाऊस कमी पडला आणि शेतकऱ्यांच्या बागा जागीच जळाल्या. सरकार शेतकऱ्यांना मदत केल्याचे मोठ मोठे आकडे सांगते तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलत नाही.
महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अटल सेतूला भेगा पडल्याचे दाखवले तर माझी टिंगल उडवली गेली आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या. समृद्धी महामार्गावर दररोज अपघात होतात आहेत त्याला जबाबदार कोण आहे. राज्यात हिट अँड रन चे प्रकार वाढले आहेत, ड्रग्जसेवनचे प्रमाणही वाढले आहे. जळगाव हिट अँड रन प्रकरणात तर तक्रार दाखल करणाऱ्यालाच पोलीसांनी मारहाण केली. महायुती सरकारने काय दिले ह्याचे राज्यातील जनतेला उत्तर द्या. तीन तोंडाच्या इंजिनाने राज्याची अधोगती केली, असेही नाना पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
हाय प्रोफाईल पाहुणे, पाहुण्यांना महागड्या भेटवस्तू… अनंत-राधिकाच्या लग्नात काय खास होते?
Majhi Ladki Bahin Yojana | महिलांच्या सशक्तीकरणाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’