बँक बुडाल्यास ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे परत मिळणार – मोदी

नवी दिल्ली- एक लाखाहून अधिक ठेवीदारांची अनेक वर्षांपासून अडकून राहिलेली तेराशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम गेल्या काही दिवसांत त्यांना परत मिळाली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम ठराविक वेळेत खात्रीशीरपणे देणाऱ्या डिपॉझिटर्स फर्स्ट या योजने संदर्भातल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यापूर्वी एखादी बँक बुडाल्यावर बँकेत जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 50 हजारांपर्यंतची विमा रक्कमच मिळत होती. मात्र त्यानंतर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या समजून घेऊन सरकारनं ही रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली, अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

रिझर्व्ह बँकेकडून संबंधित बँकेवर निर्बंध आल्यापासून केवळ 90 दिवसांच्या आत 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना परत करणं आपल्या सरकारनं बंधनकारक केल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारामन, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. पूर्वी जर एखाद्या बँकेचे दिवाळे निघाले तर ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळतीलच याची खात्री नव्हती. तसेच ते कधीपर्यंत मिळतील याचा देखील कोणताही निश्चित कालावधी नव्हता. मात्र आता ठेवीदारांच्या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी तोडगा शोधून काढला आहे. आता कोणतीही बँक डबघाईला आली, किंवा तिचे दिवाळे निघाले तर ठेवीदारांना त्यांचा पैसा 90 दिवसांच्या आता परत मिळणार आहे. केंद्राच्या या नव्या कायद्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये एक लाखांपेक्षा अधिक ठेवीदारांना त्यांचे अनेक वर्षांपासून बँकेत अडकलेले पैसे परत मिळाले आहेत. ही रक्कम जवळपास 1300 कोटी रुपयांच्या घरात आहे.