नरेंद्र मोदी करणार आज आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन होणार आहे. हा देशातला पहिला उत्सर्जनमुक्त विमानतळ असेल. दळणवळण यंत्रणा मजबूत करण्याच्या आणि हवाई वाहतूक क्षेत्राला अत्याधुनिक बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार या विमानतळाची निर्मिती होणार आहे.

या नव्या विमानतळामुळे उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं देशातलं एकमेव राज्य ठरणार आहे. जेवर इथल्या विमानतळामुळं या भागात गुंतवणूक वाढून औद्योगिक विकासाला चालना मिळेल, तसंच स्थानिक उत्पादनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात करणं शक्य होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर हे विमानतळ उभारलं जाणार असून त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. विमानतळ परिसरातच बस, रेल्वे आणि मेट्रोसाठीही स्थानकं उभारली जाणार असल्यानं प्रवाशांना सोयीचं जाणार आहे.

5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरणार आहे. हे विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि त्याच्या बांधकामानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दबावही कमी होईल.