आदित्य ठाकरे आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल, तुम्ही खोके-खोके काय करता ? 

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु आहे. यातच आज शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Shiv Sena spokesperson Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तुमच्या दौऱ्यांसाठी आणि ब्रँडिंगसाठी गेल्या चार-पाच वर्षात कुणी खर्च केले, असा सवाल म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.

म्हस्के म्हणाले, गेले चार-पाच वर्षे ब्रँडिंगसाठी मित्रांच्या कंपन्यांनी कोट्यवधी खर्च केले. तुमच्या सभा, आदित्य संवाद यात्रा घेण्यात आल्या. त्यासाठी एसी हॉल तयार करण्यात आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याकरिता सुशिक्षित माणसं आणण्यात आली. हे सगळे इव्हेंट तयार केले त्यासाठी खर्च लागतो ना. तो खर्च कुठून केलात. कशातून केलात. कुठल्या अकाउंटमधून केलाय. हा खर्च कुठल्या अकाउंटमधून दाखवण्यात आला. तुमचे परदेश दौरे यासाठी कुठून खर्च केला, असा सवाल  म्हस्के यांनी केला.

आदित्य ठाकरे आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल. तुम्ही खोके-खोके काय करता. आधी हे जे दौरे तुम्ही केलात. त्याचा खर्च कुठून केलात, हे आधी सांगा. कशातून केलात? तुमच्या कुठल्या कंपन्या आहेत. तुमचा व्यवसाय काय. त्यामुळे कुणावर खोक्यांचा आरोप करता. दौरे आणि ब्रँडिंग या सगळ्या गोष्टी हवेतून निर्माण झाल्या का , असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.