राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून जेल मधे टाकण्यात आले होते.. तेव्हा तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य कुठे होतं ?

ठाणे – शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut), भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.या प्रक्षोभक भाषण प्रकरणी सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, धर्मराज्य पक्षचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष अनिता बिर्जे, निवेदक सचीन चव्हाण यांच्यासह सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम 500 ,504 अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि सरकारवर टीका होत आहे. या टीकेला आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तेव्हा त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून जेल मधे टाकण्यात आले होते.. आणि गुन्हा दाखल केला.. तेव्हा तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य कुठे होत??

त्या मेळाव्यामध्ये  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पंतप्रधान, राष्ट्रपती ज्या महिला आहेत यांची टिंगल टवाळी केली गेली..महीला राष्ट्रपती यांच्या नावावरून मस्करी करणे अशी वक्तव्य मेळाव्यात करण्यात आली.. जैसी करणी वैसी भरणी.. नारायण राणे यांच्यावेळी तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य विसरला होतात..त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने आरोप ,टिंगल टवाळी ठाण्याच्या सभेत नेत्यांनी  केली आहे त्यामुळे गुन्हे दाखल केलेले आहेत. ही दिशा आपणच दाखवलेली आहे या महाराष्ट्राला आपण दाखवलेल्या दिशेनेच आपल्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत.. त्यामुळे आता आरडाओरड  करण्याची गरज नाही..असं म्हस्के यांनी म्हटले आहे.