‘जीतो कनेक्ट’मध्ये 7 मे रोजी राष्ट्रीय व्यापार महापरिषद; व्यापार धोरण, भविष्यातील संधी यासंबंधी चर्चा होणार

पुणे : जीतो पुणे च्या वतीने आयोजित केलेल्या जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषद व ट्रेड फेअर ( jito Connect 2022 International Conference and Trade Fair ) मध्ये राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 7 मे रोजी ही परिषद होणार असून यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर ( Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur ) , नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत ( Policy Commission CEO Amitabh Kant ) व नॅशनल रेनफेड एरिआ अथॉरिटी भारत सरकारचे सीईओ अशोक दलवाई ( Ashok Dalwai ) उपस्थित राहणार आहेत.

जीतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर, पुणे व्यापारी महासंघ आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापरिषद शनिवारी (7 मे) दुपारी 3.30 वाजता होणार आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया यांनी दिली. यावेळी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, मुख्य सचिव पंकज कर्नावट, जीतो पुणेचे सहसचिव किशोर ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

नीती आयोगाच्या माध्यमातून देशाचे धोरण निश्चितीचे काम होत असल्याने या परिषदेनिमित्त नीती आयोगाचे अमिताभ कांत यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार आहे. पुढील काळात देशाचे व्यापार धोरण कसे असेल हे त्यांच्याकडून समजण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर हे युवा नेते आहेत. देशाच्या राजकारणातील त्यांचे योगदान पाहता केंद्र सरकारची व्यापारासंबंधीची दिशा समजण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेले कृषी धोरण ठरविण्यामध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी अशोक दलवाई यांचे योगदान मोठे आहे. या परिषदेमध्ये त्यासंदर्भातही महत्वाची चर्चा होणार आहे, असे राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.

कोरोना काळात इतर क्षेत्राप्रमाणेच व्यापार क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत होत असलेल्या राष्ट्रीय व्यापार महापरिषदेमध्ये व्यापार क्षेत्रातील भविष्यातील संधीविषयी सविस्तर चर्चा होणार आहे. पहिल्यांदाच व्यापार क्षेत्रातील तीन मोठ्या संघटनांनी एकत्र येऊन अशा प्रकारची परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी पुणे, महाराष्ट्रासह देशातील व्यापारी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी होणारी ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. मात्र, त्यासाठी नावनोंदणी करण्याची आवश्यकता असून जीतो कनेक्ट 2022 च्या संकेतस्थळावर जाऊन ही नावनोंदणी करता येईल, असे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.