उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नवनीत राणांची खोचक टीका

मुंबई  –  संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नव्हते, अशी खोचक टीका भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे.

मनसेनेही केली टीका 

मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वविरोधी, जातीयवादाचं विष पेरणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची युती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना तरी अपेक्षित होती का, असा सवाल त्यांनी केलाय. संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रावादी काँग्रेसची बी टीम आहे तर उद्धव ठाकरेंची सेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ड टीम आहे. महाविकास आघाडीशी युती केल्यामुळे आमदार, खासदार नाराज झाले. ते उद्धव ठाकरेंना सोडून निघून गेले. आता संभाजी ब्रिगेडशी युती केल्यानंतर सामान्य शिवसैनिक अस्वस्थ असून तोदेखील उद्धव ठाकरेंना साथ देणार नाही, अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी व्यक्त केली.