उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमार यांनीही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला – नवनीत राणा

अमरावती – महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी भाजपासोबत (BJP) असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे वर्तन केलंय, भाजपसोबत युती करुन नितीश कुमारांनी भाजपच्या नावे मतं मागितली, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे पोस्टर लावून मतं मागितली. त्यामुळे बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांना इतक्या जागा मिळवून दिल्या.

भाजपकडे दुप्पट आकडे असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं, याचं कारण म्हणजे अमित शाह (Amit Shah) यांनी शब्द दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ज्याप्रमाणे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आज नितीश कुमारांनीही तेच करुन शपथ घेतली. जसे उद्धव ठाकरेंचे आमदार एक-एक करुन त्यांची साथ सोडून गेले, तशीच परिस्थिती नितीश कुमारांची होईल, बिहारची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.