हा पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील, मलिकांचा वानखेडेंवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पोलखोल सत्र सुरु ठेवले आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर मांडली. समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खोट्या प्रकरणांमध्ये अनेक लोकांना तुरुंगात टाकले, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

वानखेडे यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे पत्र लिहिले. यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते पुढे आले आहेत. मात्र राक्षसाचा जीव पोपटात आहे, या कथेचे उदाहरण देत मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. भाजपसारख्या राक्षसी विचारांच्या लोकांना आता चिंता वाटू लागली आहे की, जर पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील. अस मलिक म्हणाले आहेत.

महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी वानखेडे यांनी कारवाईची मालिका सुरु केली, ज्यामध्ये निशाणा साधून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी सरकार आपल्या राज्यात फिल्म सिटी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मात्र हे बॉलिवूड उभारण्यासाठी अनेक मराठी दिग्गज कलाकारांनी योगदान दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले.