‘एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि तंबाखूतील फरक तरी कळतो का ?’

मुंबई : कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या काही दिवसापासून पत्रकार परिषद घेऊन एनसीबी या केंद्रीय यंत्रणेच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत आहेत. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेत १३ जानेवारी रोजी त्यांचे जावई समीर खान यांची जी अटक झाली होती, त्याबाबत सत्यपरिस्थिती माध्यमांसमोर मांडली.

याआधी नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांच्या जावयावरही एनसीबीने कारवाई केली असल्याचे प्रश्न विचारले गेले होते. त्यावर आज नवाब मलिक यांनी सविस्तर भूमिका मांडली.

२७ सप्टेंबरला एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडे आठ महिन्यानंतर जामीन दिला. यावेळी कोर्टाची लेखी ऑर्डर काल( बुधवारी) प्राप्त झाली आहे. जस्टीस जोगळेकर यांनी ही ऑर्डर जाहीर केली. या ऑर्डरनंतरचा सगळा घटनाक्रम नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडला.

१४ जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यावर दाखवले गेले की, मोठ्याप्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी फर्जीवाडा करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे असेही नवाब मलिक म्हणाले. करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना फ्रेम केले गेले. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

हे देखील पहा