वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांची नाचक्की; हायकोर्टात मागितली बिनशर्त माफी

मुंबई – एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयासमोर तोंडी हमीपत्राचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं. तसंच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.यानंतर आता नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावर शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठानं याविषयी विचारणा केल्यानंतर मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यावेळी बिनशर्त माफी मागतो. यापुढे अशी विधानं करणार नाही, याची हमी देतो, असं प्रतिज्ञापत्रात मलिक यांनी नमूद केलंय.