फुलं वाहिली, हात जोडले… समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर आरएसएसच्या स्मृती मंदिरात

नागपूर- अमलीपदार्थ प्रतिबंधक कक्ष अर्थात एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशिमबाग येथील स्मृती मंदिरात दर्शन घेतले आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. तर, काहीच दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे लवकरच राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचीही चर्चा समोर आली होती. यानंतर आता ते सपत्निक आरएसएसच्या स्मृती मंदिरात पोहोचल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी काल (१९ मार्च) नागपुरातील रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले. समीर वानखेडे हे सपत्नीक आरएसएसच्या स्मृती मंदिरात गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या असून सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.