पोलिस होण्याचा एनसीसी विद्यार्थ्यांचा मार्ग अधिक सुकर; एनसीसी उमेदवारांना बोनस गुण मिळणार

मुंबई : राष्ट्रीय छात्र सेने(एनसीसी)च्या प्रमाणपत्र धारीत उमेदवारांना पोलिस भरतीत प्राधान्य मिळावे, या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. राज्याच्या महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना पोलिस दलात दाखल होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

एनसीसी एक्स कंडेट असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद कापडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी यांनी महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य गृह विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या पोलीस भरतीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले होते. सदर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिक घेत मंत्री ॲड. ठाकूर यांनी लवकरच ठोस निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल असे आश्वासन दिले होते.

अखेर त्या आश्वासनाची पूर्ती होत राष्ट्रीय छात्र सेने(एनसीसी)च्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांच्या हिताचा निर्णय जाहीर झाला. यामध्ये एनसीसीच्या ‘क’ प्रमाणपत्रधारक उमेदवारास पोलीस भरती परीक्षेच्या एकूण गुणांच्या पाच टक्के बोनस गुण मिळणार असून, ‘ब’ प्रमाणपत्रधारक उमेदवारास तीन टक्के आणि ‘अ’ प्रमाणपत्रधारक उमेदवारास दोन टक्के बोनस गुण मिळणार असल्याचा दिलासा देणारा निर्णय आहे. महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य गृह विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या पोलीस भरतीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी मिळणार आहे.