शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय झाल्यास कडाडून विरोध करू – राष्ट्रवादी

मुंबई – कोरोनाच्या काळात जेव्हा उपहारगृह बंद होती… लोकांचा रोजगार बंद होता… रोजंदारी बंद होती त्याकाळात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पोटाची भूक भागवता यावी या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी उपक्रम राज्यभर राबवला होता. त्यामुळे गरीबांची ही शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून विरोध करेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

शिवभोजन थाळीच्या माध्यमातून लाखो गरीब व सर्वसामान्य लोकांना अतिशय अल्पदरात स्वादिष्ट व पौष्टिक थाळी देण्यात आली होती. घरकामगार, फेरीवाले, रिक्षावाले अशा लाखो लोकांसाठीच शिवभोजन थाळीची संकल्पना महाविकास आघाडीने मांडली असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले ईडी सरकार ठाकरे सरकारच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेत सर्वसामान्यांची शिवभोजन थाळी बंद करण्याच्या किंवा त्याच्यात कपात करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास किंवा कुठलीही कपात केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.