युवकांचा एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर आता बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. बैलगाडा शर्यत ही अनेकगावांची परंपरा आहे. काही वर्ष ही परंपरा कोर्टांने बंदी घातल्यामुळे बंद पडली होती आता ती पुन्हा चालू होत आहे त्यामुळे या भागातील बैलगाडा मालकांसह नागरिकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे.

बैलगाडा शर्यत चालू होत असताना सर्वोच्च न्यायालयाने  घालून दिलेल्या अटी,शर्थी यांची पायमल्ली होणार नाही याची काळजी बैलगाडा मालक आणि आयोजक यांनी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर राजकीय श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांच्या नेत्यांनी काही प्रमाणात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी (Shivaji Adhalrao-Patil) तर तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 1 जानेवारीला नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची बक्षीसेही जाहिर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, बैलगाडा घाट शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत.

दरम्यान, एका बाजूला राष्ट्रवादीचे नेतेच या शर्यतीचे आयोजन करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी केलेले एक ट्वीट सध्या बरेच चर्चेत आलेआहे. ते म्हणाले, नांगरे पाटील आणि भरत आंधळे यांच्या भाषणांमुळे जसा चांगल्या युवकांचा एक वर्ग वाया गेला तसाच एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय असं राऊत यांनी म्हटले आहे.

या ट्वीट खाली अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी राऊत यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेचे स्वागत देखील केले आहे.

https://twitter.com/RajeshP02836114/status/1476808015697244162?s=20