‘शेतकरी आणि कामगार यांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे’

पिंपरी : उत्तर प्रदेश येथिल लखीमपुरच्या शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला सोमवारचा महाराष्ट्र बंद नागरिकांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामान्य नागरिकांबरोबरच व्यापारी, लघुउद्योजक, कामगार, शेतकरी या सर्वांनी हा बंद यशस्वी केला. समाजातील हे सर्व घटक केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळे चिडून आहेत. इंधन दरवाढ त्यामुळे महागाई आणि वाढती बेरोजगारी यामुळे केंद्र सरकार विरुध्द सर्वत्र राग आहे. याचा उद्रेक म्हणून सोमवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

उत्तर प्रदेश लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर केंद्रीय मंत्री पुत्राने धावते वाहन घालून काही शेतक-यांना चिरडून ठार केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सोमवारी (दि. 11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांना संबोधित करताना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी व्हावा यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन व्यापा-यांशी, कामगार, लघुउद्योजकांशी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सर्व नागरिकांनी केंद्र सरकार विरुध्द तीव्र भावना व्यक्त केल्या. समाजातील सर्व घटक महिला, कामगार, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक आज केंद्र सरकारच्या निष्ठूरपणा विरुध्द संतप्त झालेले आहेत. देशाचा पोशींदा बळीराजा आणि कामगार यांनाच संपवण्याचे काम मोदींचे सरकार करीत आहे.

आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मोदी – शहा यांच्या सरकारने सत्तर – पंचाहत्तर वर्षात उभा केलेला भारत विकायला काढला आहे. लाखो कामगारांनी लढून संमत झालेले कामगार कायदे आताच्या केंद्र सरकारने मोडीत काढले आहेत. कोणताही शेतकरी, कामगार किंवा कामगार संघटनांची मागणी नसतानाही भांडवलदारांना फायदा मिळवून देणारे आणि पुढच्या पिढ्या गुलामगिरीत ढकलणारे कायदे मोदी सरकारने केले असे डॉ. कैलास कदम म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, लखीमपूर शेतकरी हत्याकांडा विषयी केंद्र सरकारला काहीही वाटत नाही. या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, मोदी फक्त भांडवलदारांचे काम करतात. अंत्यत बेमालूमपणे बोलणारे कोणते पंतप्रधान असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पिंपरी चिंचवड शहर जसे कामगार नगरी आहे तसे ते शेतक-यांचेही शहर आहे. या राज्याला उध्दव ठाकरे यांच्या रुपाने मितभाषी, समयसूचक मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पुन्हा विकासात एक नंबरवर येईल असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरुध्द घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरुण बो-हाडे, तानाजी खाडे तसेच कामगार नेते अनिल रोहम आदींनीही केंद्र सरकारचा निषेध करणारे भाषण केले.

हे देखील पहा