राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील; सेनेच्या नेत्याचा दावा

सोलापूर – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) अशा तीन पक्षांचे सरकार असले, तरी राज्यभर ठिकठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा संघर्ष कायम समोर येताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी सक्रीय झाली असून अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यातच आता आणखी कारवाई सुरु झाली असून सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांची ईडीकडून चौकशी (ED Enquiry) झाली आहे.

बबनदादा शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय कोकाटे आणि सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिंदे यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असून साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे, शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पिता पुत्राची तीनवेळा चौकशी झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याविरोधात आवाज उठवणार असं माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटलं आहे.