‘राजकारण यूट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्यएवढं सोपं नाही’, राष्ट्रवादीच्याच आमदाराने कोल्हेंना सुनावलं !

पुणे : खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्याच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. खेड तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेतले जात नसल्याचा आरोप करत दिलीप मोहिते यांनी उघड नाराजी जाहीर करत अमोल कोल्हे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

तुम्ही स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे खासदार झाला आहात, याचे भान असूद्या असा इशारा दिलीप मोहिते यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे. ‘खेड तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता… हे काही बरं नाही. समाजकारण यू ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्यएवढे सोपं नाही. असा जोरदार टोला दिलीप मोहिते यांनी अमोल कोल्हे यांना लगावलाय

तर, ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली, त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत जा ! असा थेट सल्लाही अमोल कोल्हे यांना आमदार मोहिते यांनी दिला. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी वाकी, संतोषनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार मोहिते बोलत होते.