मुंबई – बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.
२०१९ मध्ये पवारसाहेबांनी (Sharad Pawar)राष्ट्रवादी – शिवसेना – कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे असेही महेश तपासे म्हणाले.
शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप (BJP) असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उध्दव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहात आहे असेही महेश तपासे म्हणाले.
आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना (Shivsena)खरी आहे हे सांगत आहेत मग इतकी वर्षे मातोश्रीचं… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत… उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली आहे ती कृती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर डायरेक्ट टिका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाली आहे असेही महेश तपासे (Mahesh Tapase)यांनी स्पष्ट केले.