औरंगाबाद : रस्ते चांगले तरच शहराचा विकास शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न करावेत, या भागातील रस्ते विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हर्सूल येथील भगतसिंग नगर येथे विविध वॉर्डामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
मंत्री शिंदे म्हणाले, शहरात विविध ठिकाणी विकासकामे होत आहेत. नागरिकांना सोयीसुविधा देणे शासनाची जबाबदारी आहे. औरंगाबादच्या मनपाला रस्त्यासाठी 250 कोटी, पाणी पुरवठा योजनेसाठी 1650 कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केलेला आहे. त्यामुळे शासनाचे विकासाला प्राधान्य असून औरंगाबाद शहरातील सोयीसुविधा अधिक दर्जेदार करण्यावर भर राहणार असल्याचेही मंत्री शिंदे म्हणाले.
सुरुवातीला कोनशिलेचे अनावरण मंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैस्वाल यांनी केले. यामध्ये त्यांनी मतदार संघासाठी 15 कोटींचा निधी दिल्याबद्दल मंत्री शिंदे यांचे आभार मानले.
https://youtu.be/FkhUTw1OjTM