‘नेहरू-गांधी कुटुंबाने कधीही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही, सर्वांना समान सन्मान दिला’

सेवाग्राम – काँग्रेस समजून घेतली आणि काँग्रेसचा विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवला, तळागाळातील लोकांशी नाळ तुटू दिली नाही तर आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय जनता पक्ष सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महागाई गगनाला भिडली असून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागरण करा. देशात धर्माच्या नावाने विभाजनाचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. भाजपच्या सत्ताकाळात ‘आयडिया ऑफ इंडिया’ धोक्यात आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर केली.

सेवाग्राम येथे प्रशिक्षण शिबीराचा समारोपीय भाषणात वेणुगोपाल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जो मार्ग आम्ही भारतासाठी तयार केला त्यावर चालणे आपणच बंद केले आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली नाही. आपण कोण आहोत याचा आपल्याला विसर पडला आहे. सेवाग्राम या नावातच लोकांची सेवा आहे. लोकांशी नाळ तुटल्याने निवडणुकीत पराभव होत आहे. त्यासाठी बुथ स्तरावर संघटन मजबूत करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. झोकून देऊन काम केल्याशिवाय पक्ष संघटन वाढणार नाही. समता, बंधुता हा काँग्रेसचा विचार आहे. तो विचार लोकापर्यंत पोहचवा. भाजप व आरएसएस राहुलजींना घाबरते म्हणून ते सातत्याने त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात. त्यांना माहिती आहे राहुल गांधी हे काँग्रेसची ताकद आहेत म्हणून ते दररोज त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात. नेहरू-गांधी कुटुंबाने कधीही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही, सर्वांना समान सन्मान दिला.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व तयार करणे, नेतृत्व आणि जनता यामधील दरी भरून काढण्याचे काम होणार आहे. काँग्रेस संघटना पुन्हा मजबूत करण्यात असे प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहेत. प्रशिक्षण विभाग पक्षाचा महत्वाचा विभाग राहणार आहे. प्रशिक्षणाची कार्यस्वरूपी आणि अनिवार्य व्यवस्था पक्षाने तयार करण्याचे ठरवले आहे. या प्रशिक्षणातून देशातील विविधता प्रशिक्षणार्थींना समजून घेता आला. सेवाग्राम मधील हे चार दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतील. डिसेंबरमध्ये प्रदेश पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम होईल तर जानेवारीत जिल्हा स्तरीय व फेब्रुवारीत तालुका पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम होणार असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.

यावेळी बोलताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, आपण सर्व नशीबवान आहात की महात्मा गांधी जिथे राहिले त्या भूमित राहून तुम्हाला त्यांचे विचार जगता आले. प्रभात फेरीत सर्व जातीधर्म भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आता पुन्हा एकदा प्रभातफेरीचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. मानवी गरजांसोबतच मानवी हक्कांची लढाई महत्त्वाची आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप व आरएसएसकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. प्रशिक्षणातून घेतलेला विचार गावखेड्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. विचारांची लढाई ही अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी तुमच्यासारख्या प्रशिक्षीत लोकांची गरज आहे. सेवाग्राम मध्ये झालेले हे शिबिर विचारांची शिदोरी देणारे ठरले असून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात असे प्रशिक्षण शिबिर घेणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व कांग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव म्हणाले की, काँग्रेस कार्यसमितीने ठराव केल्याप्रमाणे विचारांच्या लढाईसाठी प्रशिक्षित पदाधिकारी तयार केले आहेत ते सर्व आपापल्या राज्यात जाऊन काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना प्रशिक्षित करतील असा संकल्प करून जाणार आहोत. काँग्रेस कार्यसमितीने जी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व कांग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव, वर्ध्याचे पालक मंत्री सुनिल केदार, माजी मंत्री आ. रणजित कांबळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव आणि पंजाबचे सह प्रभारी हर्षवर्धन सपकाळ, आशिष दुआ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर उपस्थित होते.

शिबिरार्थींनी चार दिवसांच्या आपल्या प्रशिक्षणातील अनुभवांची माहिती दिली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री बी. के. हरीप्रसाद, खा. राजीव गौडा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, दिलीप रे, ज्येष्ठ गांधीवादी व सेवाग्रामचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, डी. पी. राय, सीलम दीपक बाबरीया यांच्यासह विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. ३४ राज्यातून आलेले १५० प्रतिनिधी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.