नेपाळ, नेदरलँड्स सरकारनं अफ्रिका खंडातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देश सावधगिरी म्हणून विविध उपाययोजना आखत आहेत. यातच आता दक्षिण अफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारनं अफ्रिका खंडातल्या कुठल्याही देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

याशिवाय नेदरलँडस् मध्ये ओमिक्रॉनचे 13 रुग्ण आढळल्याची माहिती तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अफ्रिकेच्या दक्षिण भागातील देशांमधून येणाऱ्या सर्व विमानांवर नेदरलँडस् मध्ये बंदी घालण्यात आली आहे. नेदरलँड्समध्ये काल दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या प्रवाशांपैकी 61 जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापैकी 13 जण ओमिक्रोन या नव्या विषाणूने बाधित असल्याचं आज नेदरलँड्स प्रशासनानं जाहीर केलं. ऑमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन प्रकार जगभरात आढळून येत असल्यामुळे अधिकाधिक देश प्रवासावर निर्बंध लादून सावध पवित्रा घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेत प्रथम सापडलेल्या, ओमिक्रॉनची नोंद बेल्जियम, बोत्सवाना, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इटली, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातही झाली आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवास बंदी घातली आहे. इस्रायल सर्व परदेशी लोकांच्या प्रवेशावर बंदी घालणार आहे तर मंगळवारपासून, ब्रिटनमध्ये येणार्‍या सर्व प्रवाशांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक आहे. दरम्यान, केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना प्रवासाच्या 72 तास आधी कोविड चाचणी करुन ती निगेटीव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागेल. भारतात येण्याआधीच्या दोन आठवड्यांच्या प्रवासाचा तपशीलही सादर करणं अनिवार्य असेल. कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांना भारतात आल्यावर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागेल आणि तिचा अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावे लागेल.

चाचणी निगेटीव्ह आली तर 7 दिवस विलगीकरणात राहून पुन्हा चाचणी करुन घ्यावी लागेल. दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरही अजून सात दिवस स्वनियंत्रणात राहावं लागेल असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. धोका नसलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस आरोग्य देखरेखीखाली राहावं लागेल. समुद्रमार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हीच नियमावली लागू असेल. 5 वर्षांखालील मुलांना लक्षणं आढळली तर त्यांना नियमानुसार उपचार घ्यावे लागतील असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.