कोरोनाबाबतच्या नव्या नियमावलीला आदित्य ठाकरेंनी दाखवली केराची टोपली

पुणे- राज्य आणि देशावर सध्या ओमयक्रोनच्या संकटाचे ढग जमू लागले आहेत. राज्याला या संकटापासून वाचविण्यासाठी नुकतेच शासनाकडून काही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. मात्र नेतेमंडळी या दिशानिर्देशांना अक्षरशः पायदळी तुडवताना दिसून येत आहेत.

ओमयक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. आणि अवघ्या चोवीस तासांत पर्यावरण आणि वातावरणातीय बदल मंत्री आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत या नियमांना तिलांजली घालण्यात आली.

पुण्यातील युवासेना मेळावा पार पडला . नव्या नियमावली नुसार राजकीय कार्यक्रमांना शंभर जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र युवासेनेच्या या मेळाव्यात शंभर हुन अधिकांची उपस्थिती होती, अनेकजण विनामस्क होते. स्वतः आदित्य ठाकरे जिथं आसनस्थ होते, तिथल्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, पण सभागृहात बहुतांश ठिकाणी ही काळजी घेतल्याचं निदर्शनास आलं नसल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे मात्र सरकारमधील मंत्री आणि नेतेच जर बेजबाबदारपणे वागत असतील तर सामान्य जनतेने तरी नियमांचे का पालन करावे असा सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.