नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासांत दिले राजीनामे; ठाकरेंना मोठा धक्का 

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यात मोठा पाठींबा हा शिंदे गटाला मिळत असून अनेक नेते शिंदे गटात सामील होत आहेत. दरम्यान,  शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोकणात नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासांत राजीनामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

विशेष म्हणजे शिवसेनेने शहर संघटक आणि महिला संघटक या पदांचीही नव्याने नियुक्ती केली होती. मात्र, यापैकी प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण हे पद स्वीकारू शकत नसल्याचे रसाळ यांनी म्हटले आहे. तर युवा संघटक वैभव पाटील यांनी नेमणूक झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.