भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची बातमी निराधार; भाजप नेत्याचे स्पष्टीकरण

मुंबई –  मी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. ही बातमी निराधार, कपोलकल्पित व षड्यंत्रपूर्वक प्रकाशित करण्यात आली आहे असं भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,  माझी राजकीय कारकीर्द भाजपा पासूनच सुरू झाली. भाजपा हा आमच्यासाठी केवळ राजकीय पक्ष नसून तो आमचा परिवार आहे. माझी भाजपा सोबत वैचारिक बांधिलकी असल्याने अन्य कुठल्याही राजकीय विचाराला जवळ करण्याचे माझ्या कधी स्वप्नातही येणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या समर्थ नेतृत्वात भाजपाचा विचार या देशाने मान्य केला आहे. भाजपाचे नेते नितीन गडकरी,  देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या समर्थ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दर्शवून या जिल्ह्यात भाजपच्या कामाची संधी व विविध प्रकारची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे.

ते म्हणाले,  मी भाजपा सोडून अन्य कुठल्या तरी पक्षात जाण्याची बातमी खोडसाळपणा आहे. या बातमीवर जिल्ह्यातील कोण्याही कार्यकर्त्याचा विश्वास नाही. एखाद्या कार्यक्रमात अनुपस्थिती दिसताच पक्ष सोडण्याचा कयास बांधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. अधिवेशन काळ वगळता भाजपाच्या बहुतांश कार्यक्रमांना व आंदोलनांमध्ये मी भाग घेतो. आंदोलनांच्या अनेक केसेस माझ्यावर दाखल आहेत. सध्या राज्यात व अमरावती शहर आणि जिल्ह्यातही भाजपाला अनुकूल वातावरण असताना त्याला नख लावण्यासाठी हे वृत्त षड्यंत्रपूर्वक प्रकाशित करण्यात आले आहे. याने आमच्या भाजपा परिवारात कवडीचाही दुष्परिणाम होणार नाही.