‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजय म्हणजे सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना सणसणीत चपराक’

सिंधुदुर्ग – शिवसेना आणि नारायण राणे संघर्षात प्रतिष्ठेची झालेली जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गड जिंकत 19 पैकी आतापर्यंत 11 जागांवर भाजपा तर 8 जागांवर महाविकासआघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाचे पॅनल प्रमुख माजी आमदार राजन तेली यांचा पराभव झाला आहे. बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा देखील पराभव झाला. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याने ही निवडणूक गाजली. या प्रकरणी अद्यापही संशयित आरोपी आमदार नितेश राणे अद्यापही अज्ञातवासात आहेत.

दरम्यान, या भव्य दिव्य विजयानंतर भाजपनेत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तर दुसऱ्या बाजूला पाटील यांनी देखील यानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेनुसार सुरुवात भाजपाच्या विजयाने झाली आहे. १९ पैकी ११ जागांवर आमचं वर्चस्व कायम राहिलंय. सत्तेच्या जोरावर सुरू असलेलं राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणेजी आणि आ. नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना ही सणसणीत चपराक आहे असं पाटील यांनी म्हटले आहे.