सुधा भारद्वाज यांच्या जामीनाविरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात केली ‘ही’ मागणी 

नवी दिल्ली : एनआयएने भीमा कोरेगाव प्रकरणी कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. एनआयएतर्फे हजर झालेले एसजी तुषार मेहता यांनी सांगितले की, सुधाची ८ डिसेंबरला जामिनावर सुटका होईल. त्यामुळे मंगळवारीच सुनावणी घेण्यात यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या 1 डिसेंबरच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 1 डिसेंबर रोजी सुधा भारद्वाज यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषद जाती हिंसाचार प्रकरणात डिफॉल्ट जामीन मंजूर केला. सुधा भारद्वाज यांना जामिनासाठी अटी तयार करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. मात्र, न्यायालयाने अन्य आठ आरोपी सुधीर ढवळे, डॉ. पी वरावरा राव, रोना विल्सन, अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग, प्रोफेसर शोमा सेन, महेश राऊत, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांचे जामीन अर्ज फेटाळले होते.

खंडपीठाने भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर ४ ऑगस्ट रोजी आणि अन्य आठ जणांच्या फौजदारी अर्जावर १ सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. विशेष एनआयए न्यायालय म्हणून अधिसूचित न केल्यामुळे पुणे न्यायालय UAPA अंतर्गत अटकेची मुदत वाढवण्यास सक्षम नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.