तोरसेकर लफंगा आहे,सर्व ठिकाणी अपयश आल्याने तो भाजपची सुपारी घेतो – निखील वागळे

मुंबई – जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि निखील वागळे यांच्यात सध्या सोशल मिडीयावर चांगलीच शाब्दिक द्वंद्व सुरु आहे. भाऊ तोरसेकर यांनी आपल्या युट्युब चॅनेल वरील एका व्हिडीओमधून निखील वागळे यांना लक्ष्य केल्यानंतर आता निखील वागळे हे चांगलेच भडकले आहेत.

वागळे यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, भाऊ तोरसेकर किंवा भाजपच्या कंत्राटी भक्तांनी माझ्याविरुद्ध गेल्या दोन दिवसात शिवीगाळीचे अनेक व्हिडिओ केले. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा उघड पाठींबा दिसतोय. मी यासंबंधी सायबर पोलीसला कळवलं आहे.

कृपया, तोरसेकरला किंवा अशा दलालांना उत्तर द्या असं मला सांगू नका. मी ४० वर्ष त्याला ओळखतो. तो लफंगा आहे. आयुष्यात बरेच प्रयत्न केले, पण सर्व ठिकाणी अपयश आल्याने भाजपची सुपारी घेतो. खोट्या बातम्या पसरवण्यात त्याचा हातखंडा आहे. भाजपवाल्यांची इच्छा आहे की मी त्याला प्रतिसाद द्यावा, म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळेल. आपण हा डाव ओळखावा. असल्या बोगस माणसाला प्रतिसाद देऊन मी स्वतःचा स्तर खाली आणू शकत नाही.