… म्हणून चक्क निखील वागळे यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभिनंदन

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Triranga) अभियान देशपातळीवर राबवले जात आहे. या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (pm modi) भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी तसेच विरोधकांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता.यावरून विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता संघाने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, यानंतर आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. रा.स्व.संघाने इतिहासात पहिल्यांदाच आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटच्या डिपीवर तिरंगा लावला आहे. या परिवर्तनाबद्दल अभिनंदन! असं वागळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. निखील वागळे हे संघाच्या विविध भूमिकांचा जाहीरपणे विरोध करत असतात मात्र संघाने डीपी बदलल्यानंतर जाहीरपणे त्यांनी संघाचे अभिनंदन सुद्धा केले आहे. वागळे यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.