‘फडणवीस यांना जनाची नाही, तरी मनाची लाज असेल तर …’; निखील वागळे यांची जहरी टीका 

मुंबई :  महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला.

हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला. सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या या आक्रमणामुळे सत्ताधारी गोंधळून गेले असून या आरोपांना नेमके उत्तर कसे द्यायचे हेच समजत नसल्याचे चित्र आहे. एकंदरीतच सरकारची चांगलीच नाचक्की झाल्याचे पाहायला मिळत असताना आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी या घडामोडींवर भाष्य केले असून त्यांनी फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे सोबतच सत्ताधारी नेत्यांचे देखील कान टोचले आहेत.

वागळे म्हणाले, देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची स्वतंत्र चौकशी झाला पाहिजे. याची दोन कारणं. एक- हे प्रकरण प्रथमदर्शनी वाटतं तेवढं सरळ दिसत नाही. दोन- फडणवीस आणि भाजप सनसनाटी निर्माण करण्यात हुशार आहेत. पण ते नेहमी पूर्ण सत्य बोलतात याची खात्री देता येत नाही. ठाकरे सरकारने नेहमीच्या बावळटपणाने हे प्रकरण हाताळू नये.

पुढचा मुद्दा नैतिकतेचा. पोलीस दलाचा राजकीय वापर फडणवीस यांच्या काळात उघडपणे झाला होता. विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे उद्योग खुद्द फडणवीस यांच्या इशाऱ्यानेच झाले होते. एल्गार परिषद किंवा भीमा कोरेगाव खटला हे याचं एक जळजळीत उदाहरण. आजही आनंद तेलतुंबडे यांच्यापासून सागर गोरखेपर्यत १४ कार्यकर्ते युएपीए लावल्याने तुरुंगात आहेत. फडणवीस यांना जनाची नाही, तरी मनाची लाज असेल तर या बोगस प्रकरणाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. मगच भाजप नेत्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवण्याचा नैतिक अधिकार त्यांना पोहोचेल. ठाकरे सरकारने मात्र हे प्रकरण ‘गांभीर्याने’ घेतलं पाहिजे. कर नसेल तर डर कसली! असं वागळे यांनी म्हटले आहे.