‘निलेश राणेंच्या कानाखाली वाजवा अन् एक लाख रुपये मिळवा’, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची ऑफर

Nagpur: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार असे म्हणत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. आता यावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवा आणि १ लाख रुपये मिळवा, अशी थेट ऑफर एका राष्ट्रवादी नेत्याने दिली आहे.

वारंवार शरद पवार यांच्याविषयी अपशब्दात बोलणारे आणि त्यांची औरंगजेबाशी तुलना करणारे माजी खासदार नीलेश राणे यांच्या कानाखील वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी ऑफर नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर (Baba Gujar) यांनी दिली आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये जातीय दंगली उफाळून आल्या आहेत. राज्यात शांतता व सलोखा कसा कायम राहील ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र राणे यात तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. आमच्या वरिष्ठ नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी असा इशाराही बाबा गुजर यांनी दिला आहे.