‘कर्तुत्व शून्य माणूस अंगठा तोंडात घेऊन कसा मंत्री होतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा…’

मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला गेला आहे.

आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘हे दिल्लीच आक्रमण. जेव्हापासून इथे निवडणूक लागेल आणि महाविकास आघाडीची भीती वाटू लागलीय, तेव्हापासून हे सुरु आहे. हे यूपी, हैदराबाद, बंगालमध्ये केलेलं. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंच्या या टीकेचा भाजप नेते निलेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. ‘हा रोज एकच बोलतोय, याची टेप अडकली आहे. याची पण चरबी एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही. आजोबां मुळे मंत्री झालास आमदार झालास नाहीतर कुठल्यातरी पार्टीमध्ये दुसऱ्याची फुकट दारू पिऊन पडलेला असता. कर्तुत्व शून्य माणूस अंगठा तोंडात घेऊन कसा मंत्री होतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.