ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार ?, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वैर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या कार्यक्रमाकडे लक्ष होतं. या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवेसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.

त्यानंतर भाषणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एकाच मंचावर असताना नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं कधी नाव घेत तर कधी नाव न घेत टोला लगावला. विशेष म्हणजे राणेंच्या कोकणातील होमपीचवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.

मात्र आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार प्रहार केला आहे. ‘सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली.’ असा टोला निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर, चिपी विमानतळाचं श्रेय माझं नाही तर कुणाचं आहे? पाहुणे येतात आणि जातात. पाहुणे राहतात तरी. मात्र, पाहुण्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक आहे. मुख्यमंत्री आले आणि गेले. काही संबंध नाही. विकासावर बोलले नाही. कोकणी माणसाला काही दिलं नाही. कोकणाने शिवसेना उभी करायला त्यांना मदत केली. पण शिवसेनेने कोकणी माणसाला काही दिलं नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली.

हे देखील पहा