‘इतका मूर्ख मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी बघितला नव्हता पण…’; पहा कुणी केली आहे ‘ही’ घणाघाती टीका

Mumbai – औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

दरम्यान, हे ऐतिहासिक पाऊल आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.आठ महिन्यांपूर्वी युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसंच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मी म्हणतोय ना संभाजीनगर तर संभाजीनगर – माजी मु. उद्धव ठाकरे. इतका मूर्ख मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी बघितला नव्हता पण मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ ही मागणी पूर्ण करून दाखवून दिलं हिंदुत्ववादी सरकार कसं चालवायचं असतं. असं राणे यांनी म्हटले आहे.