कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल; निलेश राणेंची टीका

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा अतिशय दारूण पराभव झाला आहे. नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदार संघातून भाजपचेच वसंत खंडेलवाल यांनी मोठा विजय मिळवला आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. महाविकास आघाडीने पूर्ण ताकत लाऊन देखील भाजपने या ठिकाणी दैदिप्यमान विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीकडे बहुमत असून देखील वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना अवघी  328 मतं मिळाली आहेत.

विशेष म्हणजे बाजोरिया यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहूमत नसतांनाही त्यांनी विजयाचा ‘चमत्कार’ घडवून आणला होता. यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नशील होते मात्र भाजपने त्यांना अस्मान दाखवले आहे.

दरम्यान, आता या विजयानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपनेते निलेश राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. ते म्हणाले, अकोला विधानपरिषद निवडणुक… बहुमत असून पण शिवसेना उमेदवाराचा दारूण पराभव. मित्रपक्षांनी दगा दिला आणि म्हणे २५ वर्षे आम्ही युती मध्ये सडलो. कोण कोणाला सडवतोय आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल.असा टोमणा राणे यांनी मारला आहे.