भाजपाची मोठी घोषणा, राणेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई – आगामी काळात पार पडणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने चांगली कंबर कसली आहे. पक्षान देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. आता फडणवीस यांच्या टीममध्ये भाजपाचे आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांची देखील निवड फडणवीस यांच्या टीममध्ये करण्यात आली आहे.

त्यामुळे भाजपा सध्या राणे कुटुंबावर भलतंच खुश आहे. नारायण राणे यांनी मागे पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्या मंत्री पदाचे संपूर्ण श्रेय फडणवीस यांना दिले होते. फडणवीस यांनी पुन्हा राणे कुटुंबाला संधी दिली आहे. नितेश राणे आता गोवा निवडणुकीत त्यांचा काय करिश्मा दाखवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांसोबत या निमित्ताने काम करण्याची संधी आमदार नितेश राणे यांना मिळाली आहे. या शिवाय भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) हेही गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये काम करणार आहेत.