नितेश राणे यांच्या अडचणी आणखी वाढल्या; अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई – संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, नितेश राणेंना अटक व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली असून, तशी पोलीसात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. तर, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत आज देखील न्यायालयात निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज जवळपास पाच ते सहा तास सुनावणी झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय उद्याच होणार आहे.

आज जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या समोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटीस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. परंतु आरोपींच्या वकिलांनी केलेली अंतरिम जामीनाची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टापुढे आपली बाजू मांडली.