नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद  मिळण्याची शक्यता; शरद पवारांना कॉंग्रेस देणार धक्का ? 

पाटणा – JDU नेते नितीश कुमार आणि RJD नेते तेजस्वी यादव (JDU leader Nitish Kumar and RJD leader Tejashwi Yadav) आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. द्विसदस्यीय मंत्रिमंडळात नंतर आणखी मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सोडून कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपची साथ ही २०२४ मध्ये त्यांना पंतप्रधान व्हायचे असल्याने सोडली असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील एक प्रबळ चेहरा म्हणून नितीश कुमारांकडे पाहिलं जातं. त्यातच आता बिहारमधील मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये नितीश कुमारांनी भाजपच्या राजकारणाला मात देत पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर युपीए अंतर्गत काँग्रेसकडून नितीश कुमारांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात नितीश कुमार यांचे वर्चस्व वाढणार असल्याचे चित्र आहे.

लवकरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांची संयोजक पदी निवड झाल्यानंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण युपीएमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रभावी नेते मानले जातात. आता नितीश कुमारांवर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.