मुंबई – इतर मागास वर्ग (ओबीसी) लोकसंख्येने मोठा आहे परंतु या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते समाजाला मिळाले पाहिजेत त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यासांठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्याबरोबर राहिल, आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली पण भाजपाने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. ओबीसी समाज मागणारा नाही परंतु संविधानाने दिलेले हक्क समाजाला मिळाले पाहिजेत आणि हे अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत संघर्ष करत राहु. ही लढाई मोठ्या शिताफिने लढावी लागणार आहे. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी १९९९ साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असे पटोले यांनी सांगितले. भानुदास माळी यांची ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते राज्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. हे संघटन उभे करुन काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढले यासाठी काम करा, असे आवाहनही पटोले यांनी केले.
माजी मंत्री सुनिल देशमुख व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचीही यावेळी भाषणे झाली.
https://youtu.be/FkhUTw1OjTM