‘बॅंकेच्या दारात पासबुक घेऊन उभे राहणारे जेष्ठ, अपंग,अनाथांना पाहिले कि मनाचा थरकाप होतो’

मुंबई – महाराष्ट्रातील सरकारने मागील पाच महिन्यांपासून श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना,संजय गांधी निराधार योजनेचा निधी वितरित केला नाही,त्यामुळे महाराष्ट्रातील वृद्ध,निराधार, दिव्यांग, परित्यक्ता, विधवा,दुर्धर आजारी,अनाथ या सगळ्या पिडीतांना प्रचंड मनस्ताप, आणि यातना सहन कराव्या लागत आहेत असा आरोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रात इतर सहाय्य योजनेत देवेंद्र फडणवीस सरकारने ६०० रूपयावरून १००० रूपये प्रती महीना केला तेव्हा असंख्य अनाथ,अपंग, वृद्ध यांच्या चेहर्‍यावर आलेला आनंद मी अनुभवला आहे. आम्ही स्वतःला पुरोगामी विचारांचे म्हणत असलो तरी महाराष्ट्रात आज अनाथ,अपंग आणि जेष्ठ नागरिकांची प्रचंड मानसिक हेडसाळणी या सरकारच्या अनास्थेमुळे होत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

पुढे बोलताना बडोले म्हणाले, तेलंगाणा सारख्या राज्यात या दिव्यांग,जेष्ठ, अनाथ, निराधार, दुर्धर रोग पिडीत, यांना ३०००/ रूपये प्रती माह अनुदान दिले जाते. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो,पण या पिडीतांना त्यांचे जगणे रेटण्यासाठी मिळणारे तुटपुंजे अनुदान वेळेवर दिले जात नाही इतकी भयानक स्थिती या राज्यात आहे. जेष्ठांना आम्ही अजुनही जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी तहसील ऑफीसची पायपीट करावी लागते. बॅंकेच्या चकरा मारून मारून जीव जायस्तोवर मनस्ताप सहन करावा इतकी या पिडीतांना भोगावयाची यातना इथल्या सरकारी यंत्रणेणे निर्माण केली.

बडोले म्हणाले, यंत्रणा कसल्या!नुसती भावनाशून्य सरकारी टेबले आणि काही वजनाशिवाय हात न चालणारी अमाणुसकी मृतवत झालेली मने. एखाद्या दिव्यांगाचे किंवा जेष्ठांचा मुलगा,मुलगी २५ वर्षाचे झाले की अनुदान बंद. बॅंकेच्या दारात पासबुक घेऊन “माझी पेंशन जमा झाली का दादा” म्हणत तासन् तास ऊन्हात उभे राहणारे जेष्ठ, अपंग, अनाथ, विधवा, यांना पाहिले कि मनाचा थरकाप होतो. पण या हृदयशून्य यंत्रणेपुढे काय करणार. उने किंवा मायनस प्रणाली राज्यात आमच्या काळात स्विकारली होती,तेव्हा तेव्हा अनुदान थांबत नव्हते.आता काय सुरू आहे ते कळत नाही.पण या लोकांची हेडसाड थांबली पाहीजे अशी मागणी बडोले यांनी केली आहे.