मुख्यमंत्र्यांइतके कुणीच सक्रिय नाही, संजय राऊत यांचा दावा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य करत चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. असं ठाकरे म्हणाले.

मनसेने काल आपला 16 वा वर्धापनदिन साजरा केला. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पु्ण्यामध्ये वर्धापनदिन साजरा केला. यावेळी भाषण करताना राऊत यांची नक्कल करत राज ठाकरे यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय अशी संजय राऊतांची खिल्ली राज ठाकरे उडवली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे. राज यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.

‘नक्कल केली चांगली गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यां इतके कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय’, असं संजय राऊत म्हणाले.