राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

परळी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray ) हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने बुधवारी दिला आहे.

राज ठाकरे यांना २२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबई येथे अटक झाली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.

या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे.. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व चिथावणीखोर वक्तव्य करण्यात या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते परळी पोलीस ठाणे सुद्धा या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.