‘अजितदादांना बोलू न देणे हा राज्यातील जनतेचा अवमान, राज्य भाजपने जनतेची माफी मागावी’

करमाळा (सोलापूर) : देहू (dehu) येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपचा निषेध केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूतील कार्यक्रमात बोलू न देणे हा राज्यातील जनतेचा अवमान असून ,राज्य भाजपने जनतेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.

याबाबत अधिक बोलताना झिंजाडे म्हणाले की,येणाऱ्या महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील भाजपने त्यांचे वैचारिक खुजेपणा यातून दाखवून दिले आहे. या कार्यक्रमाला तेथील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना आमंत्रणही देण्यात आले नव्हते. हा सामाजिक व वारकऱ्यांचा कार्यक्रम असताना भाजपकडून यात राजकारण केले असल्याचे दिसत आहे. कार्यक्रमाचे स्वरूप पहाता भाजपने वैचारिक पातळी सोडली आहे. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीची धास्ती भाजपने घेतली असल्याचे यावरून दिसत आहे. पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यांना या कार्यक्रमात बोलू दिले नाही. याची भाजपने आता माफी मागायला हवी.असं ते म्हणाले.