बोलघेवड्या नेत्यांमुळे ओबीसी आरक्षण गेले; बावनकुळेंचा हल्लाबोल

मुंबई : ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर महाविकास आघाडीला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि मन्युष्यबळ उभे करावे लागेल. आजपर्यंत महाविकास आघाडीने आयोगावर केलेला खर्च पाण्यात गेल्याचे चिन्ह आहेत. पुढील १५ दिवसात हे काम पूर्ण करायचे असेल तर तात्काळ पावलं उचलण्याची विनंती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात ७ मोठ्या महानगर पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमधून ओबीसी समाजाचे नेतृत्व बाद करण्याचे मनसुबे महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे आहेत. परंतु ओबीसी समाज राजकीय आरक्षणाच्या प्रतीक्षेत असून, तो त्यांचा हक्क आहे. याच निवडणुकांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे नेतृत्व घडते. विकासात्मक दृष्टीने या निवडणुका लवकर होणे गरजेच्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा पूर्ण करण्याचे काम आयोगाकडून होणे आवश्यक आहे. परंतु आता मोठी वक्तव्य न करता हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकाने पावलं उचलण्याची विनंती आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ओबीसी आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल आरक्षण देण्याइतका सक्षम नसल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. या अहवालातील त्रुटी दूर करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या ओबीसी मंत्र्यांना आणि आयोगाला दिली होती. पण त्यावेळी मंत्री केवळ वक्तव्य आणि आंदोलन करीत बसले. अशाच बोलघेवड्या नेत्यांमुळे ओबीसी आरक्षण गेले असल्याची खंत यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.