आता बोंबला : काँग्रेसने घोषित केलेल्या उमेदवाराने समाजवादी पार्टीत केला प्रवेश

लखनौ – यूपीच्या बरेली कॅंट विधानसभेच्या जागेवर काँग्रेस पक्ष चांगलीच तोंडघशी पडली आहे. बरेली कॅंट विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या घोषित उमेदवार सुप्रिया एरेन यांनी शनिवारी पक्ष सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला. सुप्रिया एरेन आता या विधानसभा मतदारसंघातून सपाच्या उमेदवार असतील. सुप्रिया सिंग एरेन या बरेलीच्या माजी महापौर राहिल्या आहेत आणि त्यांचे पती प्रवीण सिंग एरेन हे बरेलीमधून काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.

सुप्रिया सिंग एरेन आणि त्यांचे पती प्रवीण सिंग एरेन यांनी शनिवारी दुपारी यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला. दोन्ही नेत्यांचे स्वागत करताना अखिलेश यादव म्हणाले, ‘तुम्ही दोघेही समाजवादी पक्षात सामील झाल्यास पक्षाची ताकद वाढेल. समाजवादी पक्ष ज्या पद्धतीने सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहे, त्या दिशेने तुम्ही लोक आल्याने अधिक वेगवान वाटचाल सुरु होईल.

सुप्रिया एरेन आणि त्यांचे पती प्रवीण एरेन हे बरेलीमध्ये दीर्घकाळापासून काँग्रेसचे चेहरे आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे अचानक पक्षातून बाहेर पडणे आणि सपामध्ये जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रिया एरन यांना काँग्रेसने बरेली कँटमधून उमेदवारी दिली होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या या जागेवरून काँग्रेसचा प्रचार करत होत्या. मात्र, आता त्यांचे निवडणूक चिन्ह ‘सायकल’ असे बदलले आहे.दरम्यान, अखिलेश यादव यांनी सुप्रिया एरेन यांना बरेली कँट विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्याची घोषणाही केली.